My feelings with Rain

 पाऊस आणि माझ्या आठवणी

——————————————————————————-

rainy season 

 

साद पावसाची आली, शहारली माती 

भुईसवे आभाळाची, जुळे आज प्रीती

 

         कवयित्री शांता शेळके यांच्या वरील ओळीमधून पावसाविषयी असणारे माझे प्रेम अचूक व्यक्त होते. “पाऊस” हो पाऊसच कित्येक लोकांचं पाहिलं प्रेम पाऊस, आणि का नको पाहिले प्रेम असायलाच हवे ! तपता कडक उन्हाळा जेव्हा अंगाची लाही – लाही करून सोडतो तेव्हा हाच पावसाळा धावून येतो मदतीला. त्याच्या त्या श्रावणसरी आकाशातून जमिनीकडे अशा सर – सर येतात जणू काही खूप वर्षापासून त्यांची आणि मातीची भेटच

झालेली नसावी, मातीत पडलेला प्रत्येक थेंब मातीत अशा प्रकारे उमटतो जसे काही मातीवर शहारे येत असावेत तसेच शहारे जसे आपल्या त्वचेवर येतात… हो..हो.. अगदी तसेच कणभरही फरक नाही !

                   पहिला पाऊस म्हणजे माझ्यासाठी जणु काही प्रिय व्यक्तीला भेटण्याची पर्वणीच. पावसाचा प्रत्येक थेंब अंगावर झेलत मातीचा दरवळणारा गंध स्वतःमध्ये सामावून घ्यावा तेवढा कमीच..! शहरात माती बघायला मिळणे कठीण पण गावाकडे उन्हाने तप्त झालेल्या मातीच्या वासाला दुसरी कशाची तोड नाही कितीही उंची अत्तराचा

सुवास त्याच्यापुढे फिका….! 

                  पावसाची चाहूल लागताच झाडांना नवीन पालवी फुटू लागते, पक्षांच्या घरटे बनवण्याच्या क्रियेला वेग येतो आणि मुंग्या आपले अन्न साठवायला सुरवात करतात, पण पावसाशी असणारे माझे नातं ही वेगळेच पावसाळा सुरू होण्याच्या सुरवातीलाच माझी To – Do लिस्ट तयार असते पाऊस पडल्यानंतर आकाशात पडणारे इंद्रधनुष्य बलपणातल्या सप्तरंगी आठवणीत घेऊन जाते, लहानपणी म्हातारी आजी म्हणायची की इंद्रधनुष्याचं टोक शोधले तर सर्व ईच्छा पूर्ण होतात त्यावेळी किती शोधले पण त्या सप्तरंगी इंद्रधनुष्याचे टोक काही मिळाले नाही कुणास ठाऊक कुठे असेल ते?

                  पावसाळ्यात गावाकडे खेळण्यासाठी खूप खेळ असतात उगवलेल्या गवताच्या इवल्या – इवल्या मोळ्या तयार करून पुठ्ठ्या च्या गाड्यांमध्ये भरून खेळायचे, नदीला खेकडे पकडायला जायचे, मासे  पकडायचे हे आमचे आवडते छंद. त्यावेळी पावसात भिजलो म्हणून सर्दी  झालेली मला कधी आठवत नाही की आजारी पडल्याचे आठवत नाही शाळेतून घरी जाताना रस्त्याने साठलेल्या पाण्यात मस्त पायाने पाणी उडवायचे मधल्या सुट्टीत कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडायच्या, केवढी मज्जा! आज वयाची 40 वर्षे पूर्ण झाली तरीही पहिला पाऊस आला की सर्व आठवणी  पुन्हा अगदी जशाच्या तशा आठवतात… काही वेळा तर त्या आठवणीत एवढे हरवून जातो की आजूबाजूचा विसर पडतो. माझ्या आठवणींच्या शिंपल्यात मी आजही एक आठवण जपून ठेवलेली आहे … रविवारचा दिवस असावा तो शाळेला सुट्टी होती म्हणून मी पण आई सोबत शेतावर जायचे म्हणून सकाळीच हट्ट करून निघालो आमचे शेत डोंगरावर वणाराईच्या कुशीत सुंदर आणि रम्य! त्या दिवशी पाऊस नव्हता पण हवेत धुके बऱ्यापैकी होते जसे जसे पुढे जावे तसे हिरवळीने नटलेली मातीची पाऊलवाट सोनाराने एकेक सुंदर मोती समोर ठेवावेत त्याप्रमाणे समोर येत होती मी आईच्या मागे मागे गवतावर साचलेले पाण्याचे थेंब पायाने उडवत मजेत चाललो होतो तेवढ्यात वाटेच्या कडेला एका दगडाजवळ इवलेसे पिवळसर रंगाचे फुल उमललेले दिसले त्याच्या पकळ्यांवरती साचलेले पाण्याचे थेंब जणू मोत्याप्रमाने भासत होते पांढऱ्याशुभ्र धुक्यात त्या हिरवळीवर ते फुल खूपच सुंदर दिसत होते बराच वेळ मी त्या फुलाकडे बघत होतो पण माझ्या मनाचे समाधान होत नव्हते आई पुढे गेली म्हणून मी पण तिच्या मागे पळत सुटलो…. तो संपूर्ण दिवस ते फुल माझ्या डोळ्यांसमोर नाचत होते….!

               पावसाळा म्हटला की सर्वांना आवडणारे धबधबे समोर येतात उंच डोंगरावरून पडणारे पाणी आणि त्यांचा आवाज सुन्न करून सोडतो, उंचावरून पडताना हवेमुळे ते पाणी पुन्हा हवेत वरती उडायला लागते आणि आजूबाजूच्या धुक्यात अजून भर पडते आजची तरी पिढी फिरायला जाते पण मोबाईल मध्ये सेल्फी काढणे यातच त्यांना रस वाटतो कधी त्या सुंदर दृष्यांचा आनंद मनात कैद करणे अवडत नाही हे सर्व बघून त्यांची दया येते.